महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ जून । गेल्या काही दिवसापासून आसाममध्ये (Assam) पुराने हाहाकार माजवला आहे. अजुनही पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. आसामच्या २५ जिल्ह्यांमध्ये २२ लाखाहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. रविवारी काही प्रमाणात परिस्थिती सुधारली आहे, तर रविवारी पुरामुळे आणखी ५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पुरामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या १२६ वर पोहोचली आहे. (Assam flood Latest News)
आसाम (Assam) राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, रविवारी बारपेटा, कछार, दररंग, करीमगंज आणि मोरीगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चार मुलांसह पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. याशिवाय दोन जिल्ह्यात ४० जण बेपत्ता आहेत. बक्सा, बारपेटा, कचार, चिरांग, दररंग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगड, गोलपारा, गोलाघाट, हैलाकांडी, नलबारी, सोनितपूर, दक्षिण सलमारा, तामुलपूर आणि या जिल्ह्यातील २२,२१, ५०० हून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे.
आसाममधील(Assam) बारपेटा या भागातील ७ लाख लोकांना पुराचा फटका बसला, तर नागावमध्ये ५.१३ लाख, कचरमध्ये २.७७ लाख लोकांना फटका बसला आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी सर्वाधिक नुकसान झालेल्या कचार जिल्ह्यातील सिलचर आणि कामरूपमधील हाजोला या परिसरात भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना मदत देण्याचे आवाहन केले. काही शहरात आठवडाभर पाणी असल्याने मदत पोहोटण्यात उशीर होत आहे.
“प्रशासनाचे सुमारे ५० टक्के काम” परोपकारी संस्था आणि लोक करत आहेत. सध्या २,५४२ गावे पाण्याखाली गेली आहेत, आणि ७४,७०६.७७ एकर शेतीचे नुकसान झाले आहे. प्राधिकरण २३ जिल्ह्यांमध्ये ६८० मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे चालवत आहे, जिथे २,१७,४१३ लोकांनी आश्रय घेतला आहे, असंही मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा म्हणाले.