महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ जून । एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 50 आमदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. गुवाहाटीतील एकनाथ शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेत महाविकास आघाडीचा पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकासआघाडी नेत्यांच्या आमदारांना सूचना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राबाहेर कुठेही न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या आमदारांना मुंबईत कधीही बोलावण्याची शक्यता आहेत. कारण राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. सर्वच पक्ष अलर्टवर आहेत. दरम्यान, भाजपनेही तातडीचे बैठक मुंबईत बोलावली आहे. भाजपनेही आपल्या आमदारांना मुंबईत बोलावले आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
दरम्यान, घोडेबाजाराचा आरोप करत महाविकास आघाडी कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. बाळासाहेब थोरात यांनी हा इशारा दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि सध्याच्या राजकीय घडामोडी यांवर चर्चा करण्यात आली.
राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्याचे आदेश दिले तर कसं सामोरं जायचं या पर्यायांवरही चर्चा झाली. सरकारी वकिलांशीही यावेळी दीर्घ चर्चा करण्यात आली. गुवाहाटीत आमदारांना मारहाण होत असून त्यांना बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं जात आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. प्रत्येक आमदाराला 50 कोटी रूपये दिले जात आहेत असा आरोप थोरात यांनी केला आहे.