शिंदे गटाचे आमदार आज गोव्यात, उद्या सकाळी पुण्यात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२९ जून । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश जारी केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाचे ५१ आमदार गुवाहाटीवरुन आज सायंकाळी साडेचार वाजता खासगी विमानाने गोव्यात पोहोचणार आहेत. त्यासाठी ७१ खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यानंतर गोव्यातून ते उद्या सकाळी ते मुंबईला पोहोचतील.

हे बंडखोर आमदार बंडानंतर पहिल्यांदा मुंबईत येणार आहेत. या आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये रोष आहे. त्यामुळे हे आमदार मुंबईत आल्यानंतर शिवसैनिकांकडून त्यांना विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आमदारांची सुरक्षाही पोलिसांपुढील मोठे आव्हान आहे. काल संध्याकाळी विधिमंडळ सचिवांनी त्या संदर्भात दोन बैठका घेतल्या. सभागृहाबाहेरची सुरक्षाही मुंबई पोलिसांची जबाबदारी असून विधानभवनाच्या आवरात आणि सभागृहातील सुरक्षेची जबाबदारी ही विधिमंडळ सचिवालयाची आहे. त्यामुळे या दोन्ही यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

दरम्यान, शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांना गुवाहाटीहून गोव्याला नेण्यासाठी स्पाईसजेटचे विमान मार्गावर आहे. याआधी स्पाईसजेटच्या विमानाने त्यांना विशेष चार्टर विमानाने सुरतहून गुवाहाटी येथे नेले होते.

उद्या गुरूवार ३० जून रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारची अग्निपरीक्षा उद्याच होणार आहे. राज्यपालांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. विशेष अधिवेशन उद्या (दि.३०) सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान होईल. सभागृहाच्या कामकाजाचे लाइव्ह टेलिकास्ट केले जावे, असेही निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.

सरकार अल्पमतात असल्याचे पत्र आपल्याला सात अपक्षांसह भाजपचेदेखील मिळाले आहे. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलवून सरकारची बहुमत चाचणी घ्या. ही चाचणी गुप्त नाहीतर हात वर करून घेण्यात यावी. यावेळी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी, असे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. मात्र, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला असून आजच महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

मोठी बातमी : ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा! उद्याच बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचे आदेश
अल्पमतात आलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगा, अशी मागणी करणारे पत्र भारतीय जनता पक्षाने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले होते. परिणामी, गेला आठवडाभर सुरू असलेल्या सत्तानाट्याचा क्लायमॅक्स आता समीप आला आहे. शिवसेनेेतील बंडानंतर सुरू झालेल्या राजकीय नाट्यात नवव्या दिवशी भाजपने एन्ट्री घेतली आणि सरकारला शक्‍तिपरीक्षेचे आव्हान देण्यासाठी राजभवन गाठले होते. आता विधिमंडळ प्रशासनाने शक्‍तिपरीक्षेची तयारीदेखील सुरू केली आहे.

महाविकास आघाडीच्या शक्‍तीपरीक्षा कशी होणार याबद्दल अटकळी बांधल्या जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ३९ बंडखोर आमदार गैरहजर राहिल्यास बहुमताचा आकडा १४५ ऐवजी १२५ वर येऊ शकतो.

अशा परिस्थितीत भाजप आणि भाजप समर्थक मिळून ११३ सदस्य होतात. बविआचे ३, शेकापचा १, अपक्ष १० आणि इतर २ असे १२९ सदस्यांचे पाठबळ भाजपकडे जमा झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *