महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२९ जून । शिवसेनेचे तब्बल ४० आमदार फोडून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. एकनाथ शिंदे महाराष्ट्रापासून तब्बल २००० किलोमीटर अंतरावर असलेल्या गुवाहाटीतील हॉटेलमध्ये असले तरी त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचे आणि कृतीकडे महाराष्ट्रातील राजकीय जाणकार बाराकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर एकनाथ शिंदे हाच चर्चेचा विषय आहे. यामध्ये राजकीय गोष्टींबरोबरच अवांतर गोष्टींवरही चर्चा रंगत आहे. (Shivsena leader Eknath Shinde revolt in Maharashtra)
यामध्ये एकनाथ शिंदे यांचा बुद्धिबळ (Chess) खेळतानाचे एक छायाचित्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो एकनाथ शिंदे सूरतच्या ली मेरेडियन हॉटेलमध्ये वास्तव्याला असतानाचा आहे. तीन-चार दिवसांपूर्वी हा फोटो प्रसिद्ध झाला तेव्हा त्यामध्ये कोणालाही फारसे विशेष वाटले नाही. मात्र, नेटकऱ्यांनी बारकाईने निरीक्षण केल्यानंतर या फोटोतील एक मोठी चूक समोर आली आहे. एकनाथ शिंदे या फोटोत बुद्धिबळाच्या चाली खेळताना दिसत आहेत, पण त्यांनी पटावर मांडलेला डावच चुकीचा असल्याचे दिसत आहे. कारण बुद्धिबळाच्या या पटावर काळ्या रंगाचे मोहरे चुकीच्या पद्धतीने मांडलेले दिसत आहेत. उजव्या बाजूकडील घोडा आणि उंट चुकीच्या घरात ठेवलेले दिसत आहेत. पांढऱ्या रंगाचे मोहरे घेऊन खेळत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त चालीही खेळल्याचेही दिसत आहे. आता एकनाथ शिंदे यांनी बुद्धिबळाचा हा डाव फक्त फोटो घेण्यापुरता मांडला असला तरीही यावरून ते सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. बुद्धिबळाच्या डावाप्रमाणे त्यांच्याकडून राजकीय खेळाचा पट मांडतानाही अशी एखादी मोठी चूक झाली आहे किंवा नाही, हे येणारा काळच स्पष्ट करेल.