देवेंद्र फडणवीसांना भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा आदेश, उपमुख्यमंत्री व्हा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० जून । देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावं, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी केले आहे. ट्विट करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा भाग व्हावे, असे म्हटले आहे. अशाप्रकारचा निर्णय भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे, याची माहिती त्यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारावा, असे केंद्रीय नेतृत्वाने म्हटले आहे. त्यांनी आपले मोठे मन दाखवत एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपद दिले तर आपण स्वत: सरकारबाहेर राहत या सरकारला पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य देऊ, असे म्हटले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची ही भूमिका पक्षाचे चारित्र्यही दाखवते आणि हेदेखील दाखवते, की आम्ही कोणत्याही पदासाठी लालसा दाखवत नाही, असे नड्डा म्हणाले.

आम्ही पदासाठी नाही, तर विचारासाठी आहोत. विचारांना पुढे नेत असताना राज्याचा विकास व्हावा, राज्यातील जनतेचा विकास व्हावा, लोकांच्या इच्छा, मागण्या पूर्ण होवोत. या सर्व गोष्टींचा विचार करता देवेंद्र फडणवीस यांनी हा विचार केला आहे. मात्र भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने हे ठरवले आहे, की देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये असायला हवे आणि सरकारमध्ये पदभार सांभाळायला हवा. त्यामुळे केंद्रीय नेतृत्त्वाने हे स्पष्ट सांगितले आहे, की देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळावा. महाराष्ट्रातील जनतेच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ताकद लावावी आणि महाराष्ट्र एक विकसित राज्य होण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे नड्डा यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *