महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ जुलै । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्याचा आम्हाला आनंद झालेला नाही. त्यांनी वेळीच निर्णय घेतला असता तर जे झाले आहे ते टळले असते. एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत त्यांनी एका राष्ट्रीय पक्षाला शब्द दिला होता. त्यामुळे नंतर आम्हाला मागे फिरणे शक्य नव्हते, असे स्पष्टीकरण शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. केसरकर म्हणाले, की आम्ही उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासंदर्भात पत्र दिले होते. मात्र, त्यांनी त्या पत्राचा विचार केला नाही.
महाविकास आघाडीच्या सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्याशी दगाफटका केला. शिवसेना पक्ष संपवण्याचा घाट त्यांनी घातला. आमदारांना मतदारसंघात दुय्यम वागणूक दिली जात होती. पराभूत उमेदवाराला राष्ट्रवादीकडून मदत केली जात होती. हेच चित्र विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही दिसले. राष्ट्रवादीशी घरोबा आम्हाला मान्य नाही. त्यामुळे, आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.