महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ जुलै । त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यातील पहिले शाही स्नान २ ऑगस्ट २०२७ ला होईल. पुरोहित संघाने तिन्ही शाही स्नानांच्या तारखा निश्चित करून गुरुवारी (३० जून) सागरानंद सरस्वती महाराज व अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेचे महामंत्री तथा श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे मुख्य संरक्षक हरिगिरी महाराज यांच्याकडे पुढील नियोजनासाठी सादर केल्या.
श्री पंचशंभू दशनाम जुना आखाडा येथे हरिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत जुना आखाड्यातील साधू-महंतांनी बैठक घेत विविध निर्णय घेतले. आषाढ शुद्ध प्रतिपदा व गुरुपुष्यामृत योगाचे औचित्य साधून महामंत्री हरिगिरी, महामंडलेश्वर शिवगिरी, श्री पंचायती आनंद आखाड्याचे गणेशानंद सरस्वती, जुना आखाड्यातील विष्णुगिरी, नीळकंठगिरी, इच्छागिरी, साध्वी शैलजा माता यांनी सकाळी कुशावर्त तीर्थात स्नान करून त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेत अभिषेक पूजा केली. कुशावर्त तीर्थ येथे झालेल्या कार्यक्रमात पुरोहित संघाचे त्रिविक्रम जोशी व प्रमोद जोशी यांनी नगराध्यक्ष पुरुषाेत्तम लाेहगावकर, उपनगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांच्या उपस्थितीत आगामी कुंभमेळ्याच्या तारखा पुढील नियोजनासाठी सादर केल्या.
कुंभमेळा पर्वकाळ असा
सिंहस्थ ध्वजारोहण : ३१ ऑक्टाेबर २०२६
प्रथम शाही स्नान : २ ऑगस्ट २०२७
द्वितीय शाही स्नान : ३१ ऑगस्ट २०२७
तृतीय शाही स्नान : १२ सप्टेंबर २०२७
सिंहस्थ पर्वकाळ समाप्ती ध्वजावतरण : २४ जुलै २०२८