शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ जुलै । एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काल गुरुवारी शपथ घेतली. तर उद्या नवीन सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य १५ आमदारांविरोधात अपात्रतेच्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यांच्या अपात्रतेवर अंतिम निर्णय होईपर्यंत त्यांना सभागृहातून निलंबित करण्याची मागणी करत शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. शिवसेनेच्या फुटीर आमदारांना सभागृहातून निलंबित करण्याची आणि त्यांच्या अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत त्यांना विधानसभेत प्रवेश करण्यापासून किंवा कामकाजात सहभाग घेण्यापासून रोखण्याची मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार दिला आहे. या याचिकेवर अन्य याचिकेसोबतच ११ जुलै रोजीच सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

आम्ही डोळे बंद करुन बसलो नाही. आम्ही ११ जुलै रोजीच सुनावणी घेऊ, असे न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ११ जुलै रोजी शिंदे यांच्या अपात्रतेच्या नोटिशीच्या विरोधातील याचिका सूचीबद्ध केल्या आहेत. यामुळे सर्व मुद्दे एकत्रितपणे तपासले जातील, असे न्यायालयाने नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *