महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । : उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला आम्ही उत्तर देणार नाही. त्यांच्या वक्तव्यांवर उत्तर द्यायचं की नाही याबाबत एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील. त्यांनी सांगितल्यानंतरच उत्तर देऊ. उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला नेहमीच आदर आहे. नाती जपण्यात जी गोडी आहे ती राजकारणात नाही, असं शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. गोव्यात त्यांनी पत्रकारांशी आज संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. केसरकर पुढे म्हणाले की, आम्ही कोणतंही सेलिब्रेशन करणार नाहीत. विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतरही आम्ही सेलिब्रेशन करणार नाहीत, असं केसरकर म्हणाले. आमचे उद्धव ठाकरे नेते आहेत. त्यांच्यासोबत भावना जोडलेल्या आहेत. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस जवळचे वाटत असतील तर हा भ्रम कधीतरी दूर होईल, असंही केसरकर म्हणाले.
एकनाथ शिंदे यांना पक्षातून काढून टाकल्याबाबत विचारलं असता केसरकर म्हणाले की, शिंदेंविरोधात केलेली कारवाई शिवसेनेला शोभणारी नाही, ही कारवाई लोकशाहीला शोभणारी नाही. याबाबत त्यांना रीतसर उत्तर पाठवण्यात येईल, असंही केसरकर म्हणाले. एकनाथ शिंदे यांना नेते पदावरून हटवल्याचं पाठवलेलं पत्र बेकायदशीर आहे. यावर कायदेशीर उत्तर देऊ. त्यांनी ऐकलं नाही तर पुढील भूमिका घेऊ. सभागृहाच्या नेत्याचा अपमान होतो तेव्हा हक्कभंग येतो. इतकं हे पद महत्वाचं आहे, असं केसरकर यांनी यावेळी म्हटलं.