महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये सर्वांच्या मुखी ‘माउली’ हा एकच शब्द असतो. हाच शब्द घेऊन पोलिसांनी यावर्षी प्रथमच ‘माउली स्क्वॉड’ची निर्मिती केली आहे. या पथकात 200 पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असणार आहे. भाविकांनी एकाच जागी गर्दी करू नये, यासाठी हे पथक कार्यरत राहणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. पोलीस संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत सातपुते बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हा पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार आदी उपस्थित होते.
आषाढी वारीमधील बंदोबस्त, गर्दी नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना याबाबत सातपुते यांनी माहिती दिली. दोन वर्षांनंतर आषाढी यात्रेचा सोहळा भरणार असल्याने यंदा अधिक भाविकांची गर्दी होईल, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानुसार दरवर्षीपेक्षा अधिकचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार असल्याचे सातपुते यांनी सांगितले. यात्रेच्या मुख्य चार दिवसांत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व प्रदक्षिणा मार्ग येथे भाविकांची मोठी गर्दी असते. अनेकदा हे भाविक एकाच जागी रेंगाळतात. तसेच, मंदिर परिसरात फोटो काढण्यासाठी जागोजागी थांबले असतात. यामुळे गर्दी होते. यावर उपाययोजना म्हणून यावर्षी माउली स्क्वॉडची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये 200 पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असून, हे पथक मंदिर परिसर व प्रदक्षिणा मार्ग येथे थांबून भाविकांना चालत राहण्याची सूचना करणार आहे. यासाठी गर्दी होणाऱया 12 जागा निवडण्यात आल्या आहेत. वारकरी एकमेकांना ‘माउली’ या नावानेच हाक देतात म्हणून पोलीसदेखील ‘माउली चालत राहा, थांबू नका’ असे आवाहन करणार आहेत. यामुळे चेंगराचेंगरीसारखे प्रकार टळतील, असा विश्वास सातपुते यांनी व्यक्त केला.