महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । राज्य विधीमंडळात आज विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली यामध्ये भाजप-शिंदे गटाचे राहुल नार्वेकर हे विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी पराभूत झाले. दरम्यान, सभागृहातील कामकाजादरम्यान शिंदे गटाच्या प्रतोदांनी एक तक्रारीचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलं यामध्ये १६ आमदारांनीच आमच्याविरोधात मतदान केल्याचा दावा केला आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने व्हीप जारी केला होता. शिवसेनेच्या व्हीप विरोधात मतदान केल्यास संबंधीत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई केली जाईल असंही शिवसेनेनं म्हटलं होतं. पण तरीही हा व्हिप धुडकावत शिंदे गटाच्या आमदरांनी राहुल नार्वेकर यांना मतदान केलं. नार्वेकर या निवडणुकीत १६४ मतांनी विजयी झाले तर त्यांचे विरोधी उमेदवार राजन साळवी यांना १०७ मत मिळाली. या निवडणुकीनंतर राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांची भाषणं पार पडली.
नेत्यांची भाषणं संपल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्याकडे आलेलं एक पत्र सभागृहात वाचून दाखवलं. ते म्हणाले, “मला एक पत्र आलेलं आहे, त्याची सभागृहानं नोंद घ्यावी. शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालयातून मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून पत्र मिळालं आहे. त्यात म्हटलंय की, शिवसेना विधीमंडळ पक्षातील १६ सदस्यांनी पक्षाच्या विरोधात मतदान केलं आहे. त्या १६ सदस्यांची नोंद मी घेतलेली आहे”
भरत गोगावले हे शिंदे गटाचे प्रतोद आहेत. दरम्यान, गोगावले यांचा प्रतोद म्हणून उल्लेख करत विधानसभा अध्यक्षांनी या शिंदे गटालाच सभागृहात मान्यता दिली. तर शिवसेनेचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू असून त्यांनी शिवसेनेच्यावतीनं व्हीप जारी केला होता. यावरुन शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून परस्परविरोधी मतदान केल्याचा दावा केला आहे. त्यामुळं आता कोणत्या आमदारांवर कारवाईवर होणार याकडं सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.