महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्देशानुसार 3 आणि 4 जुलै रोजी मुंबईत विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर तातडीने बोलावलेल्या या अधिवेशनात रविवारी बंडखोर आमदार, भाजप व महाविकास आघाडीचे आमदार उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला.
ते म्हणाले की, आजच्या अधिवेशनात एकाही बंडखोर आमदाराने माझ्या डोळ्यात डोळे घालून बघायची हिम्मत केली नाही. ते सर्व आमदार नजर चुकवून दुसरीकडे पाहत होते. आज तुम्ही आमच्यापासून नजर चुकवलीत, पण तुम्ही आमदार म्हणून जेव्हा मतदारसंघात जाल त्यावेळेस मतदार व शिवसैनिकांना काय सांगणार हा प्रश्न आहे. असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर केला.