महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार करत सहजपणे अध्यक्षपद जिंकलं. आधी आवाजी मतदान आणि नंतर प्रत्यक्ष मतमोजणी करण्यात आली. राहुल नार्वेकर यांनी १६४, तर शिवसेनेच्या राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. यानिमित्ताने एकनाथ शिंदे आणि भाजपाने पहिली लढाई जिंकली आहे. आता उद्या म्हणजेच सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे.
सरकार स्थापन केल्यावर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार रविवार आणि सोमवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. सोमवारी विश्वासदर्शक जाईल.