महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुलै । “राज्यात नव्याने स्थापन झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार केव्हाही कोसळू शकते, असे भाकीत वर्तवतानाच मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा,” असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक रविवारी रात्री झाली. त्या वेळी शरद पवार यांनी राज्यातील सद्य:स्थिती, नवीन शिंदे -फडणवीस सरकार यावर भाष्य केले. तेव्हा त्यांनी मध्यावधी निवडणुका होतील असं म्हटलं आहे.
शरद पवार यांनी दोन मुख्य कारणांमुळे शिंदे सरकार कोसळेल असा दावा व्यक्त केला आहे. यापैकी पहिल्या कारणाबद्दल बोलताना पवार यांनी शिंदे गटाच्या नाराजीबद्दल भाष्य केलं आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना आमदारांचा मोठा गट गेला असला तरी त्यांच्यात सर्व आलबेल नाही. अंतर्गत नाराजी सुरू झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रिपद मिळेल; पण अनेकांना मंत्रिपदाची संधी मिळणार नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील अंतर्गत नाराजी वाढेल. त्यातून एकनाथ शिंदे यांचे सरकार कधीही कोसळू शकते,” असे भाकीत शरद पवार यांनी वर्तवले आहे.