अध्यक्षपदाची निवडणूक शांततेच्या वातावरणात पार ; आज खेळ विश्वासाचा ; विधानसभा गाजणार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुलै । विधानसभेचे अध्यक्षपद जिंकत एकनाथ शिंदे-भाजप सरकारने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहिला डाव जिंकला. आता शिंदे सरकार सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडणार असून त्या निमित्ताने सत्तापक्ष व विरोधक यांच्यातील दुसरा सामना बघायला मिळेल. या निवडणुकीत भाजपचे दोन आमदार अनुपस्थित असताना १६४ मते घेवून भाजपचे राहुल नार्वेकर जिंकले. या सरकारला १६६ आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले. आता नवे सरकार विश्वासमतही जिंकेल अशी स्थिती आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेतील व्हिपयुद्ध समोर आले. सरकारवरील विश्वासदर्शक ठराव आम्ही भक्कम बहुमताने जिंकू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विशेष अधिवेशनात पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट आमनेसामने येऊन तणाव निर्माण होईल, असे म्हटले जात होते परंतु दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी संघर्ष टाळला. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडली.

जे अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने घडले त्याचीच पुनरावृत्ती सोमवारी सभागृहात होण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून मतदान मागितले जाईल. मतदान खुल्या पद्धतीने होणार आहे. प्रस्तावाच्या बाजूने कोण आणि विरोधात कोण याची शिरगणती करून निकाल दिला जाणार आहे. कोणी व्हिप झुगारला म्हणून शिरगणती थांबविली जात नाही. विश्वासदर्शक ठरावाच्या विरुद्ध अध्यक्षांकडे वा न्यायालयात नंतर दाद मागण्याचा मार्ग मात्र मोकळा असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *