श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज साेलापूर जिल्ह्यात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुलै । टाळ-मृदंग व हरिनामाचा गजर करत लाखो भाविकांसह निघालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रविवारी फलटण येथील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर बरडकडे मार्गस्थ झाला. हा वैष्णवांचा मेळा सायंकाळी बरडगावी विसावला. सातारा जिल्ह्यातील अखेरचा मुक्काम करुन हा सोहळा सोमवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा गेल्या मंगळवारपासून सातारा जिल्ह्यात असून लोणंद, तरडगाव व फलटण याठिकाणचा मुक्काम आटपून हा पालखी सोहळा बरडच्या दिशेने मार्गस्थ झाला. फलटण ते बरडकडे हा पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना विडणीच्या हद्दीत हा पालखी सोहळा आल्यानंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच रूपाली अभंग, उपसरपंच आशा मदने, ग्रामविकास अधिकारी ए. एन. साळुंखे, श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, पोलिस-पाटील शितल नेरकर तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य उपस्थित होते.

त्यानंतर विडणी गावच्या पालखीतळावर हा सोहळा विसावल्यानंतर विडणी व परिसरातील लोकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी सपूर्ण पालखीतळ आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता.माऊलींचा पालखी सोहळा बरडमध्ये सायंकाळी 7 च्या सुमारास आल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यानंतर पालखी तळावर आल्यानंतर सर्व भाविकांच्या उपस्थितीत समाज आरती करण्यात आली. त्यानंतर माहुलींच्या दर्शनासाठी बरडकरांनी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम बरड येथील झाल्यावर हा पालखी सोहळा सोमवारी सकाळी 9 वाजता सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *