महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुलै । राष्ट्रवादीमध्ये सध्या अजित पवार (Ajit Pawar) हे विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. रविवारी संध्याकाळी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. यावेळी अजित पवारांना विधानसभा विरोधी पक्षनेतेपद द्यावं, अशी मागणी आमदारांनी केली. या पदाला अजितदादा योग्य न्याय देऊ शकतात, असं मत आमदारांनी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
गेले अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस या पदावर होते तर अजित पवार उपमुख्यमंत्री होते. मात्र, आता सरकार बदललं असल्याने देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत, तर अजित पवार आणि फडणवीसांची जागा घेणार असल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेता हे पद अतिशय ताकदीचं असतं. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेता कोण असेल, याचा निर्णय घेईल.
रविवारी झालेल्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार यांनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर बोलताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस, भाजपमधील ज्येष्ठ नेते आणि राहुल नार्वेकर यांना चांगलंच डिवचलं. यानंतर अजित पवार यांचं भाषण चांगलंच चर्चेचा मुद्दा ठरलं. आता विरोधीपक्षनेता हे पद अजित पवारांकडे जातं का, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.