महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुलै । हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा असं आव्हान शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. एकीकडे शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पोहोचले होते. यावेळी त्यांनी भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव असल्याचा आरोप केला.
उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, “लढायचे असेल तर सोबत राहा. भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ. आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल.तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल”. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा असं आव्हानही त्यांनी दिलं.
उद्धव ठाकरेंनी यावेळी घटनातज्ज्ञांना विनंती केली. ते म्हणाले की, “आपण घटनातज्ञ आहात. सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून सुरु आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा.
“देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याबाबत सर्वाना सत्य बोलू द्या. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.