महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुलै । अजित पवार आणि मी अडीच वर्षांपूर्वी ७२ तासांसाठी सत्तेत होतो. आम्ही चांगले मित्र आहोत. अजित पवार जरी शरद पवार यांचे पुतणे असले तरी त्यांनी आपला एक वेगळा ठसा निर्माण केला. यामुळे ते तरुणाई, कार्यकर्त्यांच्या पिढीचे ताईत बनले, अशा शब्दांत उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांची स्तुती केली.
अजित पवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यावर फडणवीस यांचे अभिनंदनपर भाषण झाले. यावेळी त्यांनी अजित पवार यांची स्तुती केली. तसेच एक योगायोगही गंमतीने सांगितला.
अजित पवार आणि मी ७२ तास सरकारमध्ये होतो. जेव्हा सरकार गेले तेव्हा आम्ही दोघांनी ठरविले होते. अडीच वर्षे मी विरोधी पक्षनेता आणि पुढची अडीच वर्षे ते विरोधी पक्ष नेते राहतील, अशा शब्दांत फडणवीसांनी कोपरखळी मारली. तसेच आताही तुमच्या आमदारांना विचारा ते सरकार बरोबर होते, असे ते म्हणत असतील असेही फडणवीस म्हणाले.
अजित पवार हे चारवेळा उप मुख्यमंत्री होते. पहिल्यांदाच ते विरोधी पक्षनेते पद भूषवत आहेत. विरोधी पक्ष नेत्याने आक्रमकतेने, संयमाने कधी चातुर्याने सरकारवर अंकुश ठेवू शकतो. विरोधी पक्षांना देखील विरोधाची मर्यादा समजायला हवी. विरोधाला विरोध नको, सकारात्मक विचार असले पाहिजेचत. आवश्यक असेल तिथे भूमिकाही घेता आली पाहिजे. राज्याचा हितासाठी दोन पाऊले मागेही घ्यावी लागतात, अजित पवार हे करतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.