छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याने नवं सरकार ; नागपुरात फडणवीसांचं वक्तव्य

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच आपले होमपीच नागपुरात आले. यावेळी फडणवीस दाम्पत्याची भव्य रॅली काढण्यात आली. जनतेशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी मागील सरकारवर टीकेची झोड उठवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या गनिमी काव्याप्रमाणे निधड्या छातीने हे सरकार महाराष्ट्रात आलं, असं फडणवीस यावेळी म्हणाले. त्यामुळे फडणवीसांनी वापरलेला ‘गनिमी कावा’ नेमका कुठला, याची चर्चा रंगली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात शिवसेना-भाजपचं नव्याने युती सरकार महाराष्ट्रात आलं. नागपुरातील हे भव्य स्वागत मुंबई-ठाण्यालाही ऐकू गेलं पाहिजे. मागील अडीच वर्ष राज्यात अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार सुरु होता. सुशासन नावाची गोष्ट नव्हती. कोण राज्य चालवतंय समजत नव्हतं, सामान्य माणसाचं कोणी ऐकत नव्हतं, कोणाचा सामान्य माणसाशी संबंध राहिला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वंशज आहोत, ते आपलं आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवरायांनी सांगितलेल्या गनिमी काव्याने, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं निधड्या छातीने हे सरकार महाराष्ट्रात आलं.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मला रोज वाईट वाटायचं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ज्या वेगाने आपण महाराष्ट्राला पुढे नेत होतो, त्याला खीळ घालण्यात आली होती. अनेक प्रोजेक्ट थांबले होते, विदर्भावर अन्याय सुरु होता, निधीची पळवापळवी झाली होती. पण पुन्हा मराठवाडा-विदर्भाला प्रगतीवर नेणारे सरकार आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार, त्यांचा प्रचंड सहभाग होता, ते आमच्या पाठीशी होते, म्हणून आम्ही हे काम करु शकलो.” असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *