Devendra Fadnavis : फडणवीसांनी सांगितलं महाविकास आघाडी सरकारच्या ऱ्हासाचं नेमकं कारण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । मी मुख्यमंत्री झालो नाही हे दु:ख नव्हते. तर दु:ख हे होते, की या सरकारने विकासाची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या हिताचे, उद्योग क्षेत्राशी संबंधित प्रकल्प आणि निर्णय रोखण्यात आले. विशेष करून विदर्भ आणि मराठवाड्यावरील अन्याय या सरकारने सुरू ठेवला, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. ते नागपुरात बोलत होते. महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी यावेळी जोरदारपणे टीका केली. कालच आम्ही विश्वासदर्शक प्रस्ताव (Floor test) प्रचंड बहुमताने जिंकला. 164 लोक आमच्याकडे होते तर विरोधात केवळ 99 लोक होते. ही एकप्रकारे मोठा विजय म्हणावा लागेल. 2019ला जनतेने भाजप आणि शिवसेना युतीला निवडून दिले. पण आमचे बहुमत छद्मीपणे पळवण्यात आले आणि अनैसर्गिक आघाडी (Mahavikas Aghadi) आकाराला आली. मी बोललो होतो की अशी आघाडी फार काळ टिकणार नाही, अशी आठवणही त्यांनी करून दिली.

शिवसेनेत का बंड झाले, याविषयी ते म्हणाले, की या सरकारमधील असंतोष मला दिसत होता. विशेषत: शिवसेनेतील अस्वस्थता दिसत होती. त्यांच्या मनात हा प्रश्न कायम होता की लोकांसमोर गेल्यावर काय सांगायचे. बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेऊन शिवसेनेने महाविकास आघाडी केली. ही अस्वस्थता आमदारांच्या मनात होती. दुसरे पक्ष मोठे होत होते. त्यातूनच शिवसेनेत उठाव झाला आणि आम्ही त्या उठावाला साथ दिली.

मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांनी सांगितले, की मला अतिशय आनंद आहे, की आमच्या पक्षाने हा निर्णय केला की आम्ही सत्तेसाठी हापापले नाही. आम्ही आग्रह केला असता तर मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळाले असते. मात्र सत्तेसाठी नाही तर विचारासाठी आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करू असे ठरले. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे फडणवीस म्हणाले.

पंतप्रधान मोदी, अमित शाह, नड्डासाहेब आणि माझ्या संमतीने हा निर्णय झाला. खरे तर हे प्रपोजल माझे होते. मीच आमच्या नेत्यांना सांगितले होते, की एकनाथ शिंदे यांना आपण मुख्यमंत्री केले पाहिजे. फक्त त्यावेळी मी बाहेर राहीन असे ठरले होते. मात्र ज्यावेळी राज्यपालांना पत्र देऊन पत्रकार परिषद झाली आणि मी घरी गेलो, त्यावेळी नड्डासाहेबांनी फोन करून त्यांनी निर्णय कळवला. अमित शाह, पंतप्रधान मोदी यांच्याशीही चर्चा झाली. नड्डासाहेबांनी तर पब्लिक स्टेटमेंट दिले. सरकार चालवायचे असेल तर सरकारबाहेर राहून चालत नाही. त्यामुळे सरकारमध्ये राहण्याच्या त्यांच्या आदेशाचे पालन मी केले, असे फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *