शरद पवारांसोबत मध्यरात्री खरंच भेट झाली का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले स्पष्टीकरण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. पण, अजूनही राजकीय घडामोडी सुरूच आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली असल्याचे वृत्त समोर आले होते. पण, शरद पवार आणि माझी अशी कोणतीही भेट झाली नाही, असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीचा फोटो समोर आला होता. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले होते. मागील दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पालिकेच्या आपत्तीव्यवस्थापन कक्षात गेले होते. त्यानंतर ते थेट पवारांच्या निवावस्थानी गेले. या भेटी दरम्यान मुख्यमंत्री एकटेच होते, त्यांच्यासोबत अन्य कोणताही नेता नव्हता अशी माहिती समोर आली होती. पण, खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वृत्त फेटाळले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

तर दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली नाही. जुनाच फोटो कोणीतरी व्हायरल केला आहे. अशी माहिती शरद पवार यांच्या कार्यालयाकडूनही देण्यात आली आहे. शिंदे आणि पवार यांची कोणतीही भेट झाली नाही अशी माहितीही देण्यात आली आहे.

दरम्यान, शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवार यांनी भाकित वर्तवलं होतं. “महाराष्ट्रातील नवं सरकार, शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकांसाठी तयार राहा”, असा आदेशच शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *