Sanjay Rathod : उद्धव ठाकरेंना समजावण्यात मला आणि गुलाबरावांना यश आलं होतं, पण…; संजय राठोडांकडून मोठा गौप्यस्फोट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केल्यानंतर अनेक वावड्या उठल्या होत्या. शिंदे गटाला भाजपची फूस असल्याचं सांगितलं जात होतं. ईडीच्या भीतीमुळेच शिंदे यांनी बंड केल्याचंही बोललं जात होतं. मागे न फिरण्यासाठीच शिंदे यांनी बंड केल्याचंही सांगितलं जात होतं. शिंदे गट चर्चेसाठी तयार नसल्याचंही सांगितलं जात होतं. पण आता राज्यात नवं सरकार आल्यानंतर शिंदे गटातील आमदार याविषयी हळूहळू बोलू लागले आहेत. बंडापूर्वी आणि बंडानंतर काय झालं होतं. याची माहिती देऊ लागले आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांनी याबाबतचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) समजावण्यात आम्हाला यश आलं होतं. पण शिवसेना नेते संजय राऊत यांनीच कळ लावली, असा गौप्यस्फोट संजय राठोड यांनी केला आहे. शिंदे यांनी बंड केल्यानंतरच्या पहिल्याच दिवशी काय घडलं याबाबत माहिती देताना राठोड यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना घेऊन बंड केल्यानंतर गुलाबराव पाटील, दादा भुसे आणि मी उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो. शिंदे यांनी बंड केल्याचं सांगून त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेण्याची विनंती केली होती. सर्व आपलेच शिवसैनिक आहेत. आपलेच आमदार आहेत. इतकी वर्ष त्यांनी शिवसेनेसाठी रक्त सांडवलं आहे. त्यांचं म्हणणं तर ऐकून घेतलं पाहिजे, असं आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं. उद्धव ठाकरेंनाही पटलं. त्यांना समजावण्यात आम्हाला यशही आलं होतं. शिंदे गटाशी चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरेंना सुरतला पाठवण्यास उद्धव ठाकरे तयारही झाले होते, असा दावा राठोड यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे शिंदे गटाशी चर्चा करण्यासाठी आदित्य यांना पाठवणार होते. तसं ठरलंही होतं. बंडखोर आमदारांना परत आणण्याची गॅरंटी आम्ही देतो, असंही आम्ही सांगितलं. पण राऊतांची एकनाथ शिंदेंशी दुश्मनी होती की काय? राऊत फारच विरोधात बोलायला लागले. त्यानंतर मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना पाठवण्याचा निर्णय झाला. नार्वेकर आणि फाटक सुरतकडे निघालेले असतानाच इकडे शिंदेंचा पुतळा जाळला गेला. मग कसं होईल? राऊतांनीच कळ लावली, असा आरोप त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *