मुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दरबारी : 11 जुलैनंतर मंत्रिमंडळ विस्तार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात सध्या बोलणी सुरू आहे. मुख्यमंत्रिपद शिंदे यांना दिल्याने अन्य महत्त्वाच्या खात्यांवर भाजपने दावा केला असून शिंदे गट सरसकट दुय्यम खाती स्वीकारण्यास तयार नसल्याचे कळते.दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी दिल्लीकडे रवाना होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत.

शिंदे यांच्या बंडानंतर सेनेने त्यांच्या गटातील १६ आमदारांवर अपात्रता कारवाईची मागणी केली आहे. या कारवाईला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून या याचिकेवर येत्या ११ जुलैला सुनावणी होणार आहे. ही सुनावणी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. १८ जुलैला राष्ट्रपतिपदाची निवडणूक पार पडल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी दुसरी शक्यता आहे. भाजपने गृह, महसूल, वित्त आणि नियोजन, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण, ग्रामविकास, ऊर्जा, अन्न आणि नागरी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, गृहनिर्माण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय, सहकार आदी महत्त्वाच्या खात्यांचा आग्रह धरला आहे. शिंदे गटालाही वित्त आणि नियोजन, वने आणि पर्यावरण, जलसंपदा, ऊर्जा, कृषी, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा यापैकी काही खाती हवी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःकडे नगरविकास, सार्वजनिक बांधकामसह (उपक्रम), सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क ही खाती ठेवतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *