महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांचे अनुक्रमे संभाजीनगर व धाराशिव असे नामांतर करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. महाविकास आघाडी सरकारमधील इतर दोन मित्रपक्ष काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीही त्याला संमती दर्शवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र याच आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘आमच्या पक्षाला न सांगताच मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी हा निर्णय घेतला. आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात हा विषयही नव्हता,’ असे सांगून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. यापेक्षा कितीतरी महत्त्वाचे विषय होते, त्यावर निर्णय घेतला असता तर अधिक चांगले झाले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.
शरद पवार यांनी रविवारी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली, त्या वेळी त्यांनी नामांतराच्या विषयावर भाष्य केले. विशेष म्हणजे पवारांच्या शेजारीच बसलेले तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नामांतराच्या निर्णयास आपण मंत्रिमंडळ बैठकीत विरोध केल्याचे सांगितले. परंतु मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असतो. त्यावर कुठलेही मतदान होत नसते. त्यामुळे नुसता विरोध किंवा निषेध करण्यात काही अर्थ नसतो, असे पवारांनी स्पष्ट केले. पवारांच्या शेजारीच बसलेले पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मात्र ठाकरेंच्या निर्णयाचे तेव्हा स्वागत केले होते. पवारांच्या वक्तव्यावर त्यांनी काहीही बोलणे टाळले.