महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । जे निष्ठावान आहेत ते मातोश्रीवर येतील. निष्ठावंतांसाठी मातोश्रीची दारे सदैव खुली असतील, असे वक्तव्य माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेदरम्यान केले. राज्य सरकारने आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला असून याविरोधात ‘आरे वाचवा’ आंदोलन केले जात आहे. आदित्य ठाकरे मुंबईतील या आंदोलनात सहभागी झाले होते. आदित्य ठाकरे म्हणाले की, मी निष्ठा यात्रेत शिवसैनिकांचे प्रेम घ्यायला आलोय. मन, हृदय जोडणे जे आहे ते शिवसैनिकांसोबत आहे. ज्यांची निष्ठा उद्धव ठाकरेंवर आहे ते मातोश्रीवर येतात. ज्यांचे प्रेम असेल, जे निष्ठावान असतील ते मातोश्रीवर येतील, त्यांना माफ करू. निष्ठावंतांसाठी मातोश्रीची दारे सदैव खुली असतील. एकीकडे आदित्य यांनी बंडखोर आमदारांना मातोश्रीवर परतण्याचे आवाहन केले तर दुसरीकडे शिंदे समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरे यांनाच नेता मानतो, अशी वक्तव्ये केल्याने शिवसैनिक संभ्रमात आहेत.