राज्यभर मुसळधार पावसाने अनेक नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै ।

मावळ ; मावळच्या कुंडमळा इथल्या रांजण खळग्यात 2 जण बुडाले. वन्यजीव रक्षक मावळ टीमनं त्यांना वाचवलं. इथे एक तरूण सेल्फी काढताना पाय घसरून पाण्यात पडला. त्याला वाचवायला गेलेला दुसराही पाण्यात बुडून लांबवर वाहत गेला. त्यांना तातडीनं वन्यजीव रक्षक टीमनं वाचवलं.

नाशिक : राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. तर विदर्भ, कोकणात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर महाराष्ट्र म्हणजेच नाशिक, नंदुरबार, धुळे, नगर जिल्ह्यातही मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब भरले आहेत. त्यासोबतच सांगली नांदेड जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

नंदुरबार ; नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यात देव नदीला पूर आला. त्यामुळे वडफळी आश्रम शाळेत पाणी शिरलं. शाळेत अडकलेल्या विद्यार्थ्यांना एका दोरखंडाच्या साह्यानं सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. तर गावातही पाणी शिरल्यानं पुरं गाव जलमय झालं.

सुरगाणा, नाशिक ; नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात संततधार सुरु आहे. लहान मोठे नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. जोरदार पावसामुळे पश्चिम वाहिन्या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. पावसामुळे रस्ते आणि भात आवणातील शेतीबांधांचं नुकसान झालंय. अनेक रस्ते, फरशी पुल, मो-या पाण्याखाली गेल्यात.

नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणावर दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेत. सध्या पावसाळा सुरू झाला असल्यानं या धरणांमधून पाणी सोडण्यात येतं. यावेळी याठिकाणी तरुण मोठ्या प्रमाणात येऊन सेल्फी काढत स्टंटबाजी करतात. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

अहमदनगर; अहमदनगर जिल्ह्यातील अकोले भंडारदरा परिसरात अतिवृष्टीमुळे बांध फुटले. पांजरे, उडदावणे आणि परिसरातील गावांमधील शेतक-यांचं नुकसान झालंय. तातडीनं पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीय. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीचा फटका बसत असून रोपं पाण्यात बुडालीत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात भात शेतीचं नुकसान झालंय.

नगरच्या अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखरावर अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात आली. पावसाचा अंदाज न आल्यानं हजारो पर्यटक शिखराच्या दिशेने गेले होते. मात्र प्रचंड प्रमाणात पाऊस सुरु झाला. आणि पाण्यामुळे गिर्यारोहक खाली उतरू शकले नाहीत. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि स्थानिकांनी त्यांची सुखरुप सुटका केली.

सांगली; सांगली जिल्ह्याच्या चांदोली परिसरात अतिवृष्टी झाली. शिराळा तालुक्यातील अनेक वाड्यांना भूस्खलनामुळे मागील वर्षापासून धोका निर्माण झालाय..खबरदारीचा उपाय म्हणून मनदूरची मिरखेवाडी, आरळाची कोकणेवाडी आणि बाष्टे वस्तीमधून एकंदर तिनशे लोकांचं स्थलांतर करण्यात आलं.

नांदेड ; नांदेड मधील आसना नदीला आलेल्या पुराने जवळपास 3 हजार हेक्टरवरील शेतजमीन खरडून गेलीय. हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये झालेल्या ढगफुटिमुळे आसना नदीला मोठा पूर आला होता. अर्धापूर तालुक्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मेंढला नाल्याला पूर आला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *