महाराष्ट्र २४- ऑनलाईन – पुणे : शहरातील औषध विक्रेत्यांना दिवसभरातील येणाऱ्या सर्व ग्राहकांची माहिती त्यांचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांकासह पोलिसांना दररोज सायंकाळी आठ वाजेपर्यंत द्यावी लागणार आहे. यासाठी एक व्हाॅट्सअप ग्रुप तयार करण्यात आला असून, त्याच्यावर न विसरता फोटो काॅपी पाठवावी लागणार आहे. याबाबतचे आदेश सहपोलिस आयुक्त डाॅ. रवींद्र शिसवे यांनी काढले आहेत. पोलिसाकडून औषध विक्रेत्यांसाठी एक नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. त्यातील निर्देशाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यावर कलम १८८ सह साथरोग अधिनियम १८९७ मधील तरतुदी व प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कोरोना विषाणुच्या संसर्गाची लक्षणे आढळून येत असलेल्या व्यक्ती मोठ्या संख्येने उपचारासाठी शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल होत आहेत. वैद्यकीय तपासणीनंतर कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या या टप्प्यात शहरातील लोकसंख्या मोठ्या संख्येने बाधित होऊ शकते. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार कोरोनाचे रुग्ण प्राथमिक टप्प्यावर ओळखणे गरजेचे आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्ती शोधणे, त्यांना योग्य वैद्यकीय मार्गदर्शन करणे व त्यातून कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडणे शक्य होणर आहे. शहरातली विविध औषधविक्री दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांत सर्दी, ताप, कोरडा खोकला, श्वसनाचा त्रास होणे या प्रकराची कोरोना विषाणू सदृश्य लक्षणे दिसून येत असल्यामुळे त्याची माहिती प्रशासनाला मिळणे आवश्यक आहे.
अशी आहे नियमावली
* सर्दी ताप, कोरडा खोकला, श्वसनाचा त्रास होणे यासाठी लागू पडणाऱ्या औषधांची मागणी करणाऱ्या ग्राहकांची नोंद त्यांचे नाव, पत्ता व फोन नंबरसह करावी लागणार आहे.
* सर्वात महत्त्वाचे म्हणेज डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनविना औषधांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची नोंद प्राधान्याने करणे बंधनकारक
* औषधे कोणासाठी घेतली जात आहेत? याची ग्राहकांकडे चाैकशी करावी लागणार, त्या रुग्णांची नावासह नोंद ठेवावी.
* दररोज सायंकाळी आठ वाजता शहर पोलिस मुख्य नियंत्रण कक्षाच्या व्हाॅट्सअप क्रमांक 8975953100 या नंबरवर ग्राहकांची नोंद ठेवलेली फोटो कॉपी पाठवावी लागणार आहे. माहिती पाठविताना औषध विक्रेत्याच्या दुकानाचे नाव व संपर्क क्रमांकाची नोंद करणे गरजेचे आहे.
* आजारी व्यक्तीला कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून येत असल्यास त्याला मनपाने कार्यान्वीत केलेल्या फ्लु क्लिनीकमध्ये वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी घेऊन जाण्याबाबत मार्गदर्शन करावे. तसेच फ्लु क्लिनिक शहरात कोठे कोठे सुरू आहेत याची यादी ग्राहकांना दिसेल अशा दर्शनी भागात लावावी लागणार आहे. ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी करणार नाहीत याच बरोबर सामाजिक अंतराची दक्षता घ्यावी. पोलिसांनी दिलेल्या सर्व सूचनाचे पालण करणे औषध विक्रेत्यांना बंधनकारक असणार आहे.