आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करा; मुंबई पोलिस आयुक्तांना आदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । आरे कारशेडविरोधात केलेल्या आंदोलनात लहान मुलांचा वापर केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने मुंबई पोलिसांना पत्र पाठवून युवा सेना नेते आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाकडून सोमवारी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना याबाबत नोटीस पाठवली. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

नुकत्याच सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने आरेच्या जमिनीवरच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर या निर्णयाविरोधात पर्यावरणवादी संस्थांनी पुन्हा एकदा आरे परिसरात आंदोलन सुरू केले. आदित्य ठाकरे यांनी रविवारी या आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी लहान मुलांचा वापर केल्याची तक्रार सह्याद्री राइट्स फोरमचे लिगल हेड दृष्टिमान जोशी यांनी ट्विटरवरून आयोगाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत आयोगाने मुंबई पोलिसांना एक नोटीस पाठवली. यामध्ये जोशी यांच्या तक्रारीसोबत जोडण्यात आलेल्या छायाचित्रामध्ये लहान मुले आंदोलन करताना दिसत असल्याचे आयोगाने म्हटले आहे. लहान मुलांचा वापर म्हणजे बालन्याय कायद्याचे उल्लंघन असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने मुंबई पोलिसांना नोटीस पाठवून तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून संबंधित मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर करून त्यांचेही जबाब नोंदवावेत. या सर्व कारवाईचा अहवाल एफआयआरच्या प्रतीसह तीन दिवसांत सादर करावा, असेही आयोगाने आदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *