महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । श्रीलंकेत राजकीय आणि आर्थिक संकट गडद होत चालले आहे. निदर्शकांनी राष्ट्रपती भवन, सचिवालय आणि पंतप्रधान निवासातून हटण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत पंतप्रधान-राष्ट्रपती राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. आपण बुधवारी पद सोडू, असे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी स्पीकरना सूचित केले आहे.
राजकीय अस्थिरतेमुळे आंतरराष्ट्रीय नाणे निधीसोबतच्या कराराला विलंब होण्याची शक्यता आहे आणि विदेशी आर्थिक मदतीशिवाय श्रीलंकेची स्थिती दररोज बिघडतच चालली आहे. पेट्रोल-डिझेल नसल्याने ‘सुवा सेरिया अॅम्ब्युलन्स सर्व्हिस’ ८३ भागांतून तात्पुरती बंद करण्यात आली आहे. अॅम्ब्युलन्स सर्व्हिसतर्फे सांगण्यात आले की, ‘आम्ही सेवा देण्यास असमर्थ आहोत. त्यामुळे आम्हाला कॉल करू नका, अशी विनंती जनतेला करत आहोत.’ रुग्णालयांत जीवनरक्षक औषधांचा तुटवडा आहे.
पेट्रोलियममंत्र्यांनी सोमवारी स्पष्ट केले की, १५ ते १७ जुलैला डिझेल आणि २२ ते २४ जुलैदरम्यान पेट्रोलची खेप येण्याची अपेक्षा आहे. एसजेबी या मुख्य विरोधी पक्षाने कार्यकारी राष्ट्रपतिपदासाठी साजिथ प्रेमदासांचा अर्ज भरण्याचा निर्णय घेतला. एसजेबीकडे ५० खासदार असून त्यांना ११३ खासदारांचा पाठिंबा हवा आहे. गोटाबायांनी राजीनामा दिल्यास २० जुलैला नव्या राष्ट्रपतींची निवड होईल.