महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । मुसळधार पावसामुळे तीन दिवस थांबलेली अमरनाथ यात्रा सोमवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. यात्रेच्या १२ व्या जथ्थ्यात ११० वाहनांतून ४,०२६ यात्रेकरू केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) सुरक्षेत रवाना झाले. त्यात ३,१९२ पुरुष आणि ६४१ महिलांसह १३ मुलांचा समावेश आहे. या वर्षी आतापर्यंत १.१३ लाखांवर लोकांनी अमरनाथ यात्रा केली आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम बेस कॅम्पकडे पहाटे ४.३० वाजता ३,०१० यात्रेकरू तर बालटालकडे पहाटे ३.३० वाजता १,०१६ यात्रेकरू जम्मूच्या यात्रेकरू निवास आधार छावणीतून रवाना झाले. शुक्रवारी अमरनाथ गुहेच्या आसपास मुसळधार पावसामुळे १६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ४१ जण बेपत्ता झाले होते. त्यानंतर मोठ्या स्तरावर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. तथापि, बेपत्ता लोकांबाबत सोमवारपर्यंत कुठलीही माहिती मिळू शकली नव्हती. यात्रा राखी पौर्णिमेपर्यंत म्हणजे ११ ऑगस्टपर्यंत सुरू राहील.