महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । भारतीय संघ आता यजमान इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका विजयाची मोहीम फत्ते करून वनडे सिरीज जिंकण्यासाठी उत्सुक आहे. वनडे मालिका विजयाच्या मिशनला दमदार सुरुवात करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मंगळवारी मैदानावर उतरणार आहे.
इंग्लंड व भारत यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. सलामीचा सामना ओव्हलवर खेळवला जाणार आहे. या मिशनदरम्यान कर्णधार रोहित शर्मासमोर सध्या तिसऱ्या वेगवान गाेलंदाजाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. तिसऱ्या वेगवान गाेलंदाजाच्या शर्यतीमध्ये चाैघांची नावे आहेत. यामध्ये शार्दूल ठाकूर, प्रसिध, अर्शदीप आणि सिराजच्या नावाचा समावेश आहे. टीम इंडियाला 2018 मध्ये टी-20 मालिका विजयानंतर लगेच झालेल्या वनडे सिरीजमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. यासाठी कर्णधार रोहित शर्मा संघामध्ये काहीसा बदल करण्याच्या तयारीत आहे.
यजमान भारताने गतवर्षी पाहुण्या इंग्लंड टीमविरुद्ध आपल्या घरच्या मैदानावर वनडे मालिका विजय साजरा केला होता. मात्र, आता वर्षभरात मोठा बदल झाला आहे. काेहलीकडून नेतृत्व काढून घेण्यात आले. तसेच इंग्लंडच्या कर्णधार माॅर्गनने निवृत्ती घेतली आहे. आता इंग्लंडच्या नेतृत्वाची धुरा जाेस बटलरकडे साेपवण्यात आली. त्यामुळे भारताला आता इंग्लंडविरुद्ध पुन्हा एकदा मालिका विजयाचा कित्ता गिरवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
भारताच्या टाॅप-3 मध्ये रोहित शर्मा, विराट काेहली आणि शिखर धवन आहेत. या तिघांनी अनेक सामन्यांत यशस्वीपणे मॅच विनरची भूमिका बजावली आहे. मात्र, यंदाच्या सत्रात रोहित शर्मा आणि काेहली सातत्याने अपयशी ठरत आहेत. त्यामुळे भारताची फलंदाजीची बाजू काहीशी दुबळी मानली जात आहे. आतापर्यंत भारत आणि इंग्लंड यांच्यात 19 मालिका झाल्या आहेत. यातील 10 मालिका भारताने जिंकल्या आहेत. फक्त सात मालिकांमध्ये इंग्लंडला विजय साजरा करता आला. भारतीय संघ आता हेच वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी उत्सुक आहे.