महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । एकीकडे शिवसेना बंडखोर आमदारांशी (shivsena mla) कोर्टाची लढाई लढत असतानाचं आता खासदारांनीही शिंदे गटाशी जुळवून घ्यावं अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackery) यांच्याकडे केली आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनएडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा द्यावं अशी शिवसेना खासदारांनी गळ घातली आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटात या निवडणुकीच्या निमित्ताने मनोमिलन होण्याची चर्चा रंगली आहे. पण उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहण्याचे ठरणार आहे.
राज्यातील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार खाली खेचत एकनाथ शिंदे गटानं भाजपच्या मदतीनं नवं सरकार स्थापन केलं. खरंतर या सत्तांतरापासून शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा राजकीय सामना सुरू झाला आहे. दोन्ही बाजूनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. शिवसेनेनं बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेची नोटीस बजावली आहे. एकीकडं राजकीय संघर्षाला धार आली असतानाचं दुसरीकडं शिवसेनेतील या दोन्ही गटांचं मनोमिलन होण्याची चर्चा रंगली आहे.
राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी मातोश्रीवर सोमवारी शिवसनेच्या खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती .या बैठकीत ही चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. भविष्यात भाजप आणि शिंदे गटाशी शिवसेनेनं जुळवून घ्यावं अशी मागणी सेनेच्या खासदारांनी उद्धव ठाकरेंकडे केली. शिंदे गटातील 50 आमदार आजही मनाने शिवसेनेसोबत असल्याचं खासदारांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळातील निर्णय घ्यावेत तर उद्धव ठाकरेंनी पक्षाचा गाडा हकावा, एकनाथ शिंदे गटाशी चर्चा करून मार्ग काढावा अशी भूमिका खासदारांनी यावेळी मांडली.
राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेनं पाठिंबा दिल्यास शिंदे गटाशी चर्चेची दारं उघडी होतील, असं मत खासदारांनी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.
राष्ट्रपती निवडणुकीवरुन शिवसेनेत मतभेद असल्याचं बोललं जातंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावर येत्या दोन दिवसात निर्णय घेणार आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवरून शिवसेनेची कोंडी तर झाली नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.