गोवा काँग्रेस आमदारांसाठी होते विमान सज्ज, आमदार ‘उडायच्या’ तयारीत; पण अचानक…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर आता गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे निम्मे आमदार बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेतृत्त्वाला याची कुणकुण लागताच पक्षाचे आमदार मायकल लोबो यांची विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याविरोधातही कारवाई होण्याची शक्यता आहे.

गोवा काँग्रेसमधील बंड अद्याप शमलेलं नाही. काँग्रेसच्या आमदारांना नेण्यासाठी चार्टर्ड प्लेन तयार ठेवण्यात आलं होतं. काल संध्याकाळी ४ वाजता त्यांना कोल्हापूर एअरफिल्डवरून नेण्याची तयारी करण्यात आली होती, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. आमदारांना नेण्यासाठी एक चार्टर्ड प्लेन तयार ठेवण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली होती, असं जीपीसीसीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितलं.

चार्टर्ड विमानाच्या उड्डाणाला परवानगी मिळाली होती. विमान महाराष्ट्रातून झेपावणार होतं. काल संध्याकाळी ४-४.३० च्या सुमारास विमान उड्डाण करणार होतं. मात्र ऐनवेळी काँग्रेसच्या काही निष्ठावंत आमदारांनी आम्हाला याची माहिती दिली. आपल्यासोबत ८ आमदार येणं अशक्य असल्याची कल्पना बंडखोर आमदारांना आली. त्यामुळे त्यांची योजना अपयशी ठरली, असं पाटकर म्हणाले.

भाजपनं मात्र काँग्रसचे आरोप फेटाळून लावले आहेत. काँग्रेसनं आपले आमदार सांभाळायला हवेत, असा खोचक सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे यांनी दिला. मला भाजपसोबत यायचं आहे, असं काँग्रेसच्या कोणत्याही आमदारानं मला सांगितलेलं नाही. गोव्यात आमचं सरकार आहे. सरकारकडे पूर्ण बहुमत आहे. मग आम्हाला कशाला आणखी आमदारांची गरज भासेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *