महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. तर कर्नाटकात अलमट्टी धरणातून (Almatti Dam) 75 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कृष्णा नदीत पूरस्थितीमुळे अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी पुन्हा एकदा झपाट्यानं वाढताना दिसतेय. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 33 फूट 9 इंच इतकी झाली आहे. जिल्ह्यातील 50 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेलेत. त्यामुळे या बंधाऱ्याहून होणारी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, शिराळा तालुक्यातील मांगले – सावर्डे बंधारा पाण्याखाली गेला आहे. तर दुसरीकडे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 18 फूट झाली आहे.