महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील यांनी संजय राऊत यांच्याविरोधात आमदारांमध्ये एवढा रोष का आहे याबद्दल भाष्य केलंय.
संजय राऊतांविरोधात बंडखोर आमदारांमध्ये एवढा रोष का आहे असा प्रश्न शहाजीबापू यांना बीबीसी मराठीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शहाजीबापू यांनी प्रांजळपणे आपण राऊत यांच्या लिखाणाचे चाहते होतो आणि ‘रोखठोक’ हे सदर आवर्जून वाचायचो असं सांगितलं. “मला त्यांचं सदर आवडायचं. मात्र अलीकडे त्यांच्या वागण्यात अहंकाराचा दर्प येऊ लगला,” असं शहाजीबापूंनी राऊत यांच्यासंदर्भात म्हटलंय.
तसेच पुढे बोलताना संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर अप्रत्यक्षपणे भाष्य करताना शहाजीबापूंनी, “हा माणूस सकाळी १० वाजता बोलायला लागतो. सगळं वातावरण त्यांनी भडकं केलंय,” असा टोला लगावला. पुढे बोलताना, “या अशा वातावरणामध्ये काम होत नाही,” असंही ते म्हणाले. यामधून त्यांनी बंडखोर आमदारांना राऊत यांच्याकडून होणाऱ्या टीकेचा त्रास होत असल्याचं सूचित केलं.