महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारून आता 13 दिवस उलटले आहे. पण, अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त लागला नाही. अशातच राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवसभर एनडीएच्या उमेदवाराच्या बैठकीत व्यस्त असल्याचे चित्र समोर आले आहे.
राज्यात मुंबईपासून ते नागपूरपर्यंत पावसाने धुमशान घातले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात नद्या धोक्याच्या पातळी ओलांडत आहे. अशा परिस्थितीत मुंबईसह ठाणे, पुणे, सातारा आणि पालघरमध्ये रेड आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. खबरदारी म्हणून सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. राज्यावर अस्मानी संकट आले असताना अजूनही मंत्र्यांचा पत्ता नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेच राज्याच्या कारभाराचा गाडा हाकत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तारच झाला नसल्यामुळे राज्याला कोणताही मंत्री अद्याप लाभलेला नाही.
विशेष म्हणजे, राज्यावर अस्मानी संकट आले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री हे राष्ट्रपतिपदाच्या (presidential election 2022) एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू (draupadi murmu) यांच्या बैठकीसाठी व्यस्त असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहे. त्यानंतर दिवसभर एनडीएच्या उमेदवारांसोबत स्नेहभोजन आणि बैठकीसाठी हजर राहणार आहे. एनडीएच्या उमेदवार द्रोपर्दी मुर्मू यांच्या बैठकीला संपूर्ण शिंदे गट हजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर संध्याकाळी शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाठ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री शिंदे बैठक घेणार आहे.