महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । आता शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. त्यात नेमकं कुणाला मंत्रिपद मिळणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच गुरुवारी सकाळी अमित ठाकरे यांना कॅबिनेटमध्ये घेण्याची ऑफर भाजपानं दिल्याची बातमी समोर आली. एका इंग्रजी दैनिकाने ही बातमी छापल्याने त्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यावर आता खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खुलासा केला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, ही बातमी धांदात खोटी असून खोडसाळ आहे. कुणीतरी जाणुनबुजून हे वृत्त पसरवून वातावरण निर्मिती करत आहेत अशा शब्दात त्यांनी वृत्ताचं खंडन ABP माझा ला केल आहे. राज्यात सत्तांतर घडत असताना मनसेच्या एकमेव आमदाराने शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने विधानसभेत मतदान केले होते. तेव्हापासून मनसे राज्याच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होईल अशी चर्चा सुरू झाली. मनसेला २ मंत्री पदे दिली जातील असे बोलले गेले. परंतु त्यावर मनसेने कुठलेही भाष्य केले नाही. मात्र आता अमित ठाकरेंचे नाव पुढे आल्यानंतर याबाबत खुलासा करण्यात आला आहे.