‘मंत्रिपद द्याच’ ? 12 बसेस अन् गाड्या घेऊन सेनेचे बंडखोर आमदार मुंबईला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । शिवसेनेमध्ये बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे जोरदार लॉबिंग आणि रस्सीखेच सुरू आहे. सुरतपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाठ आज शक्तिप्रदर्शन करण्यास मुंबईला रवाना झाले आहे.

औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट हे आज औरंगाबादवरून मुंबईला आपल्या मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना घेऊन मुंबईकडे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी निघाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आम्ही जात असल्याचे त्यांच्या नगरसेवक मुलाने सांगितले आहे. तर संजय शिरसाट आपल्या पदरात मंत्रिपद घेण्यासाठी शक्तिप्रदर्शन करत असल्याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. औरंगाबाद वरून 12 लक्झरी गाड्या आणि काही छोट्या गाड्या मुंबईच्या दिशेने निघाल्या आहे. कार्यकर्त्यांसाठी 12 गाड्यांचा ताफा पाहून शहरातील सर्वच जण अवाक् झाले आहे.

विशेष म्हणजे, संजय शिरसाठ हे एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सुरतपासून सहभागी झाले होते. गुवाहाटी व्हाया गोव्यात आल्यानंतर ते मुंबईत आले होते. त्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर शिरसाठ हे औरंगाबादेत दाखल झाले. आता मंत्रिपद मिळवण्यासाठी शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वीच बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. संतोष बांगर यांची शिवसेनेनं जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांनी हे शक्तिप्रदर्शन केलं होतं. तर संजय शिरसाठ हे आपल्या कार्यकर्त्यांनी घेऊन शिंदे यांच्यासोबत असल्याचे सांगण्यासाठी मुंबईत पोहोचत आहे. विशेष म्हणजे, खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी संध्याकाळी 5.30 वाजता संजय शिरसाठ यांच्यासाठी वेळ राखून ठेवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *