महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । पुण्यात मागील सात दिवसांपासून रेड अलर्ट असल्याने मुसळधार पाऊस पडला मात्र आज सकाळपासून पुण्यात पावसाने ब्रेक घेतला आहे. शहरात ढगाळ वातावरण आहे. रिमझिम पावसाच्या सरी पडत आहेत. त्यामुळे मुसळधार पावसापासून पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. आजपासून पुढील दोन दिवस हवामान खात्याने अतिमुसळधार पावसाची शक्यता दर्शवली होती. मात्र शहरात पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र आहे.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने मुठा नदी दुथडी वाहत आहे. शिवाय नदीपात्रातील रस्ते बंद करण्यात आले आहे. दरवर्षी पुण्यातील नदीपात्रात असंच चित्र असतं. त्यामुळे नागरिकांना पर्यायी रस्ता वापरावा लागतो आणि वाहतुक कोंडीचाही सामना करावा लागतो.
दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने दर्शवला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानूसार आज-उद्या शाळा बंद असणार आहे. पुण्यातील पावसाची परिस्थिती पाहून शाळेबाबत प्रशासन पुढील निर्णय घेतील असंही प्रशासानाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. पुणे जिल्ह्यातील 14 व 14 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशरा दिला असल्याने जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर व पुरंदर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना 14 जुलै ते 16 जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले होते.