महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुलै । भाजपनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी 11 वाजता या दोन नेत्यांची भेट झाली. पण यामुळे राज्याच्या राजकारणात एक नवी चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे राज ठाकरे बाळासाहेबांची जागा घेणार का?
राजकारणात मातोश्रीचा दरारा
बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख असताना मातोश्रीचा एक वेगळा दरारा होता. मुंबईत दौऱ्यावर येणारी कोणतीही बडी असामी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला जायची. अगदी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार देखील. युपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांनी मातोश्रीवर जाऊन पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले होते.
मातोश्रीवरुन दिल्या जाणाऱ्या एका आदेशाने कधीही न थांबणारी मुंबई एका क्षणात थांबत होती. क्रिकेटच्या खेळपट्ट्या उखडल्या जात होत्या, तर चित्रपटाचे खेळही रद्द होत होते. गेल्या चाळीस वर्षांपासून मातोश्री हे राज्यातल्या राजकारणातील महत्वाचं स्थान बनलं.
मातोश्रीचा दरारा कमी झाला?
पण आता चित्र बदलतंय. शिवसेना खासदारांच्या दबावामुळं उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे मुर्मू देखील ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर जातील, अशी अपेक्षा होती. मात्र मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणं टाळलं. यानिमित्तानं भाजपनं उद्धव ठाकरेंचं राजकीय महत्त्व कमी झाल्याचं दाखवून दिलंय.
अनेक भाजप नेते थेट शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेत आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर रावसाहेब दानवे या आणखी एका केंद्रीय मंत्र्याने प्रत्यक्ष शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे, कृपाशंकर सिंह, प्रसाद लाड यांनीही शिवतीर्थावर हजेरी लावली.