महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुलै । भायखळा येथील शाखा क्र. 208 मधील शिवसैनिकांवर तलवारीने गुरुवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला, मात्र पोलिसांकडून याविरोधात कोणतीच कारवाई न झाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले. भायखळय़ातील शिवसेना शाखेला भेट देत हल्ल्याबद्दल शिवसैनिकांची विचारपूस केली. यावेळी पोलिसांना हल्लेखोरांचा शोध का लागला नाही, असा जाब विचारतानाच शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. जे होईल त्याला तुम्ही जबाबदार राहाल, असा इशाराच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिला.
भायखळय़ातील शिवसैनिक बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या गाडीवर गुरुवारी अज्ञातांनी हल्ला केला. याबाबत पोलीस तक्रार करूनही केवळ एनसी घेण्यापलीकडे पोलिसांनी काहीही केले नाही, अशी तक्रार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसैनिकांनी मांडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱयांना धारेवर धरले. शिवसैनिकांचे रक्त सांडू नये म्हणून मी शांततेचे आवाहन करतोय, पण हे जर होणार असेल तर शांत बसणार नाही, मग जे काही होईल त्याला जबाबदार तुम्ही असाल, अशा शब्दांत बजावताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लेखोरांचा तपास अजून का झाला नाही, असा जाब विचारला.
पोलिसांवर नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत जे काही केले जात आहे ते सूडाचे राजकारण आहे. गुन्हाही नोंदवला जात नाही, अशा राजकारणात तुम्ही पडू नका. राजकारण जे काही करायचे ते आम्ही करू, पण जर शिवसैनिकांच्या जिवाशी खेळ होणार असेल तर शांत बसणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी माजी नगरसेवक यशवंत जाधव यांच्यावर शिवसैनिकांनी संशय व्यक्त केला असता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना तुम्ही त्यांचा जबाब नोंदवला का, असा सवाल केला. जर कुणाविषयी संशय निर्माण होत असेल तर त्यांचाही जबाब नोंदवा, अशाही सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या.
उपमुख्यमंत्र्यांना जाब विचारा , आपल्याकडे करतेकरविते, खरे कारभार करणारे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना जाब विचारा. जर पोलीस संरक्षण करणार नसतील तर शिवसैनिक स्वतःचे संरक्षण करायला समर्थ आहेत. पोलिसांनी हात वर करावेत आणि मग वेडेवाकडे काही झाले तर त्याला तुम्ही जबाबदार राहाल, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावले. यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, उपनेते अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, मनोज जामसूतकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक शाखेत उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, शिवसैनिकांचे रक्त सांडू नये म्हणून मी शांततेचे आवाहन करतोय, पण हे जर होणार असेल तर शांत बसणार नाही, मग जे काही होईल त्याला जबाबदार तुम्ही असाल! पोलिसांवर नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत जे काही केले जात आहे ते सूडाचे राजकारण आहे. गुन्हाही नोंदवला जात नाही, अशा राजकारणात तुम्ही पडू नका. आपल्याकडे कर्ते-करविते, खरे कारभार करणारे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना जाब विचारा. जर पोलीस संरक्षण करणार नसतील तर शिवसैनिक स्वतःचे संरक्षण करायला समर्थ आहेत, असं त्यांनी ठणकावलं.
शिवसेनेचे भायखळय़ाचे उपविभागप्रमुख विजय कामतेकर आणि समन्वयक बबन गावकर हे दोघे गाडीतून जात असताना गुरुवारी रात्री राणी बाग येथील अण्णाभाऊ साठे सभागृहाजवळ त्यांच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला झाला. दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने गाडीवर रॉड मारला मग शिवीगाळ करून ते पळून गेले. याप्रकरणी त्यांची तक्रार दिल्यानंतर भायखळा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशी सुरू केली आहे. तपासात ज्या बाबी निष्पन्न होतील त्यानुसार कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.