हवाई इंधनाच्या दरांमध्ये दुसऱ्यांदा कपात ; विमान प्रवास होणार स्वस्त?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६  जुलै । दीर्घ प्रतीक्षेनंतर आणि सततच्या दरवाढीनंतर शनिवारी विमान इंधनाच्या (एटीएफ) किमतीत २.२ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने ही घट झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या किमतीच्या अधिसूचनेनुसार, एटीएफची किंमत ३,०८४.९४ रुपये प्रति किलोलीटर किंवा २.२ टक्क्यांनी कमी करून १,३८,१४७.९३ रुपये प्रति किलोलीटर करण्यात आली आहे.

एटीएफच्या किमतीत यावर्षी फक्त दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात त्याची किंमत १,४१,२३२.८७ रुपये प्रति किलोलीटर (१४१.२३ रुपये प्रति लिटर) च्या शिखरावर पोहोचली होती. तसेच गेल्या पंधरवड्यातील आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतींवर आधारित दर महिन्याच्या १ आणि १६ तारखेला एटीएफच्या किमती सुधारित केल्या जातात. यापूर्वी १ जुलै रोजी किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

क्रूड स्वस्त झाले
क्रूडच्या किमती नरमल्याने ही घट झाल्याचे मानले जात आहे. गेल्या आठवडाभरापासून क्रूड १०० डॉलरच्या जवळपास आहे. गेल्या काही दिवसापासून ते १२० डॉलरच्या जवळ होते, पण आता किंमती खाली आल्या असून क्रूडमध्ये आणखी घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे एटीएफही स्वस्त झाला आहे.

२०२२ मध्येच हवाई इंधनाच्या किमती सलग १० वेळा वाढवण्यात आल्या आहेत. यानंतर १ जून रोजी त्याच्या किमतीत १.३ टक्क्यांनी किरकोळ कपात करण्यात आली. तर त्यानंतर पुन्हा त्यात जोरदार वाढ झाली असून दर कमी होण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे.

विमान प्रवास स्वस्त होईल?
विमान चालवताना एटीएफवरील खर्चाचा वाटा ४० टक्के आहे त्यामुळेच हवाई इंधनाच्या दरात वाढ झाल्याचा थेट परिणाम प्रवाशांवर होतो. यावर्षी १६ मार्च रोजी कंपन्यांनी एटीएफमध्ये सर्वात मोठी वाढ केली होती., ज्यानंतर किंमत १८.३ टक्क्यांनी वाढली. यानंतर १ एप्रिल रोजीही किमती दोन टक्क्यांनी, तर १६ एप्रिलला ०.२ टक्क्यांनी आणि १ मे रोजी ३.२२ टक्क्यांनी वाढल्या होत्या. मात्र, आता किमती कमी केल्या जात असल्याने विमान प्रवासही स्वस्त होऊ शकतो असे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *