महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । राजकारणातील घडलेल्या घडामोडींवर बोललो म्हणजे शरद पवार यांच्यावर टीका केली, असे होत नाही; मात्र यातून जर कोण चुकीचा अर्थ काढत असेल, तर मी त्यांची जाहीर माफी मागतो. पवार हे माझ्या गुरुस्थानी असून, माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये त्यांचे स्थान मोठे आहे. त्यामुळे यापुढे काही बोलायचे असल्यास पक्षाचे नाव घेऊन बोलेन; मात्र पवारांविरोधात कधीच बोलणार नसल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.
राज्यात आता विकासाला नवी दिशा देणारे कोकणचे हक्काचे सरकार आले आहे. त्यामुळे यापुढे कोकणात सुखाचे दिवस दिसतील. माझ्या मतदारसंघातील भेडसावणारे कबुलायतदार गावकर प्रश्न, मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल, कॅटरिंग कॉलेज, सिंधुस्वाध्याय, मुंबई विद्यापीठाला जमीन आदी सर्व प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असेही श्री. केसरकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘‘भाजप नेते राणे यांच्यावर मी काही बोलणार नाही. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोलणे टाळावे, असे आमचे म्हणणे होते. तर दुसरीकडे त्यांची मुले माझ्यापेक्षा लहान आहेत. त्यामुळे मी त्यांना लहान म्हटले होते; परंतु तसे म्हणण्याचा त्यांना राग येत असेल, तर यापुढे मी त्यांच्यावर बोलणार नाही. आज शिंदे गटाचा प्रतिनिधी म्हणून मी बोलत आहे. जी काय संधी मिळाली, याचे समाधानही आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात जर कोण माझ्यावर टीका करत असेल, तर त्याला उत्तर देणार नाही. सध्या जे कोण टीका करत आहेत, ते आपल्या नेत्यांच्या समाधानासाठी बोलत असतील; पण माझ्यावर ते नक्कीच बोलणार नाहीत, असा विश्वास आहे. गेली अडीच वर्षे याच प्रश्नांवर बैठक घेण्यासाठी धडपड सुरू होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातल्यानंतर लवकरच या संदर्भात बैठक घेण्याचे त्यांनी मान्य केले आहे. वेळेवर कर्जफेड करणाऱ्या कोकणातील शेतकऱ्यांना लाभ देण्याचे काम शिंदे सरकारने केले आहे.’’
केसरकर म्हणाले, ‘‘यापुढे नारायण राणे यांना कोकणच्या विकासासाठी नक्कीच विश्वासात घेऊ. यापूर्वीही त्यांनी सहकार्याची ग्वाही दिली होती. स्थानिक पातळीवर जर कोणी पदाधिकारी, कार्यकर्ते माझ्यावर टीका करत असतील, तर त्याकडे लक्ष देणार नाही. राणेंवर बोलल्यानंतर त्यांच्या मुलाने ट्विट करून ‘मातोश्री’चा पोरगा असेल तर तेथे भांडी घासायला जा, असे वक्तव्य केले, ते अत्यंत चुकीचे आहे. आज आपण जी भूमिका घेतली, त्यावर शिवसैनिकांकडून विरोध केला नाही; मात्र मी ‘मातोश्री’ची बाजू घेऊन बोलत असताना राणेंच्या मुलाने केलेल्या टीकेवर कोणीच बोलत नसल्याचे आपल्याला दिसून आले.’’