केवळ दोन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाला कोणतीही घटनात्मक वैधता नाही; विरोधकांचा दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेच मंत्रिमंडळ गठित आहे. शिंदे आणि फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांत अनेक निर्णय घेतले. शनिवारी औरंगाबाद शहराचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाने घेतला. याही पूर्वी अनेक योजना रद्द करणे, नव्या योजना जाहीर करणे असे निर्णयही घेतले. मात्र शिंदे-फडणवीसांच्या या निर्णयांना घटनात्मक वैधताच नसल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी ट्वीट करून तसा दावा केला, तर घटनातज्ज्ञांनी दोन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयांना घटनात्मक वैधता नसते, असे स्पष्ट केले आहे.

भारताच्या राज्यघटनेनुसार देशातील कोणत्याही राज्यात किमान 12 मंत्री असलेले मंत्रिमंडळ असणे बंधनकारक असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दोन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाला घटनात्मक वैधता नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी हा मुद्दा आपल्या ट्वीटद्वारे उपस्थित केला आहे. राऊतांनी या ट्विटमध्ये ‘राज्यपाल, हे काय सुरू आहे?’ असा सवालही केला आहे.

शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाने भाजपशी हातमिळवणी करत सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यांना राज्यपालांनी मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्या शपथविधीला दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटूनही मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून दोन मंत्र्यांच्या या सरकारवर सडकून टीका होत आहे.

डॉ. अनंत कळसे या पेचावर काय म्हणाले?
एका माध्यम समूहाशी बोलताना विधिमंडळाचे माजी सचिव डॉ. अनंत कळसे म्हणाले की, फक्त दोनच मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयाला कोणतीही घटनात्मक वैधता नसते. मंत्रिमंडळात कमीत कमी १२ सदस्य (मंत्री) असायला हवेत. याप्रकरणी न्यायलायतही जाता येईल.

संजय राऊतांचे ट्विट..
भारतीय राज्यघटनेच्या कलम १६४ १अ नुसार राज्याचे मंत्रिमंडळ किमान १२ मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येच्या मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेली २ आठवडे महाराष्ट्रात २ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही. ‘राज्यपाल, हे काय सुरू आहे ?’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *