‘ठाकरेंचा फडणवीसांना फोन’ ; हे वृत्त खोटं ; उद्धव ठाकरेंकडून वृत्ताचं खंडन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर काही तासांत शिवसेना पक्ष वाचविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसारित केलं आहे. दोन आठवड्यांपूर्वी देखील ‘ठाकरेंचा फडणवीसांना फोन’ अशा बातम्या अनेक माध्यमांनी चालवल्या. परंतु उद्धव ठाकरेंनी असा कोणताही फोन केलेला नाही. अशा बातम्या प्रकाशित होत आहेत ह्या निव्वळ भूलथापा आहेत, असं शिवसेनेच्या वतीने आधीच स्पष्ट केलेलं आहे. शिवसेना जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान यांनी शिवसेनेच्या वतीने खुलासा केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आणि त्यांच्याजवळ असलेले आमदार पाहता आता ही परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेली आहे, असं समजल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विश्वासातल्या आणि फडणवीसांशी उत्तम कनेक्ट असलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून देवेंद्र यांच्या संपर्क साधला, असं वृत्त काही माध्यमांनी प्रकाशित केलं. ठाकरेंनी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही फोन केल्याचं काही वृत्त माध्यमं चालवत आहेत. मात्र या सगळ्या अफवा आहेत. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना किंवा कोणत्याही भाजप नेत्याला फोन केलेला नाही, असं शिवसेनेने स्पष्ट केलं आहे.

सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता, असं वृत्त काही माध्यमं सूत्रांच्या हवाल्याने चालवत आहेत. अशा बातम्या प्रकाशित होत आहेत, या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये, असा खुलासा उद्धव ठाकरे यांचे माध्यम सल्लागार तथा शिवसेना जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी केलाय.

महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांत्तर झालंय. आता एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. ३० जून रोजी महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. शिवसेनेचे ४० आमदार आणि अपक्ष १० आमदारांनी शिंदेंच्या नेतृत्तावर विश्वास ठेवला. भाजप नेतृत्वाने देखील सगळ्यांनाच धक्का देऊन देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली. शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन आता दोन आठवडे उलटून गेले आहेत. येत्या आठवड्यात शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *