महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । मध्य प्रदेशातील 11 महापालिका निवडणुकांचे धक्कादायक निकाल समोर येत आहेत. गेल्यावेळी सर्व 11 शहरांमध्ये नगराध्यक्षपद भाजपच्या ताब्यात होते. मात्र यावेळी सिंगरौलीमध्ये पहिल्यांदाच आम आदमी पक्षाच्या उमेदवार राणी अग्रवाल नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. भाजपने बुऱ्हाणपूर, सागर, खांडवा आणि सतना येथून विजय मिळवला आहे. चित्रपट अभिनेते मुकेश तिवारी यांची मेहुणी संगीता तिवारी यांनी सागर येथील महापौरपदी भाजपकडून विजय मिळवला आहे. तर भोपाळ, इंदूर आणि उज्जैनमध्ये भाजप आघाडीवर आहे. दुसरीकडे जबलपूर, छिंदवाडा आणि ग्वाल्हेरमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. विशेष म्हणजे तब्बल 57 वर्षानंतर ग्वाल्हेर आणि 23 वर्षानंतर जबलपूरमध्ये काँग्रेस पक्षाचा महापौर निवडून येत आहे.
ग्वाल्हेरमध्ये केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं चांगलं वर्चस्व आहे. त्यांच्या होम ग्राउंडवर काँग्रेसचा उमेदवार महापौर होत असल्याने शिंदेंसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. पण भाजपला ग्वाल्हेरमध्ये मिळत असलेल्या पराभवामागे भाजपमधील मतभेद हेच कारणीभूत असल्याची माहिती समोर येत आहे. ग्वाल्हेरमध्ये काँग्रेसच्या उमेदवार शोभा सिकरवार या सकाळपासून आघाडीवर आहेत. तर भाजप उमेदवार सुमन शर्मा या पिछाडीवर आहेत. विशेष म्हणजे ग्वालियरमध्ये भाजप उमेदवाराचा विजय व्हावा यासाठी पक्षातील दिग्गज नेत्यांनी चांगलाच जोर लावला होता. तरीही भाजप उमेदवाराचा पराभव होताना दिसत आहे.
ग्वाल्हेरमध्ये भाजप उमेदवार सुमन शर्मा यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी रोड शो केले होते. तरीही या बड्या नेत्यांना आपल्या नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यात अपयश आलं. ग्वाल्हेरची जागा अनेक वर्षांपासून भाजपच्याच ताब्यात होती. पण आता ही जागा काँग्रेसच्या पारड्यात जाताना दिसत आहे. भाजप उमेदवाराच्या पराभवाने ज्योतिरादित्य यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसेल, असं मानलं जात आहे.