महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाले पण 16 दिवस उलटले तरीही मंत्रिमंडळ विस्तार अजूनही झालेला नाही. 20 किंवा 21 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहे. दिल्ली दरबारी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा करण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यात शिंदे हे देशाचे महाधिवक्ता तुषार मेहता यांचीही भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर, सर्वोच्च न्यायालयात येत्या 20 जुलै रोजी शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये कोर्ट काय निर्णय देते हे पाहण्याचे ठरणार आहे. पण, त्याआधीच एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार आहे.
दरम्यान, शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याबाबत शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 11 जुलै रोजी सुनावणी झाली. पण, कोर्टाने खंडपीठ स्थापन केल्यानंतर सुनावणी घेण्यास परवानगी दिली होती. अखेरीस आता सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीनसदस्यीय खंडपीठ स्थापन झाले आहे. न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, रामण्णा, आणि हिमा कोहली यांचे खंडपीठ बुधवारी याचिकेवर सुनावणी करणार आहे.