महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । शिवसेनेतील बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसेंदिवस आपलं संख्याबळ वाढवताना दिसत आहेत. आपल्यासमवेत आलेल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांशी मेळाव्याद्वारे संवाद साधत ते आपली भूमिका आणि बाळासाहेबांचं हिंदुत्त्व पटवून देत आहेत. तर, स्थानिक पदाधिकाऱ्यांचाही पाठींबा ते स्विकारत आहेत. अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा शिंदेगटात प्रवेश झाल्यानंतर आता शिंदेगटाकडून शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड झाल्याचं समजतं.
एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली असून उपनेतेपदी अनेक आमदारांना संधी देण्यात आली आहे. दिपक केसरकर यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. शिंदेगटाच्या आमदारांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यातच, राष्ट्रीय कार्यकारिणी निवडण्यात आल्याचे समजते. मात्र, या निवडीच्या बातमीला कुठलाही आधार नसून ती अफवा असल्याचे शिवसेना प्रवक्ते दिपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. पण, तशी कार्यकारिणी ठरवायची असल्यास एकनाथ शिंदे यांना तो अधिकार आहे, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. तर, शिवसेनेचे सर्वच खासदार आमच्यासोबत आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या राजधानी दिल्लीत जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना वेग आला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आमदारांच्या गटाने काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेच्या १४ खासदारांनी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावल्याचे समोर येत आहे. लोकसभेतील १९ पैकी १४ खासदारांनी हजेरी लावल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे, आता दुसरीकडे खासदारांचा मोठा गट एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने जाणार अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहे. विशेष म्हणजे या गटाचे नेतृत्त्व खासदार राहुल शेवाळेंकडे राहिल, असेही समजते.
खासदारांवर दिल्लीकरांचा दबाव
दरम्यान, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही यासंदर्भात केंद्रातील भाजपवर आरोप केला आहे. संसदेच्या अधिवेशनातच शिवसेना खासदारांना फोडण्याचा कट आखला जात असून दिल्लीकरांच्या दबावाखाली शिवसेना खासदार आहेत, असा थेट आरोपच गटनेते खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. त्यामुळे, शिवसेनेतील खासदारांचाही मोठा गट आता मूळ शिवेसनेपासून फारकत घेत असल्याचं सद्यपरिस्थितीवरुन दिसून येत आहे.