महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । भारतात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोकं वर काढलं असून अनेक राज्यात मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. अशातच जगातील 76 देशांमध्ये दहशत पसरवणाऱ्या मंकीपॉक्सने आता भारतातही हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. केरळमधील कन्नूर शहरात सोमवारी दुसरा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग खडबडून जागं झालं आहे. याआधी गुरुवारी केरळमधील कोल्लममध्ये पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे एकीकडे कोरोना तर दुसरीकडे मंकीपॉक्स अशा दुहेरी संकटात देश सापडला आहे. दरम्यान, मंकीपॉक्सपासून आपला आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेतले पाहिजेत.
राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, दुसरा रुग्ण 31 वर्षीय तरुण आहे. तो 13 जुलै रोजी दुबईहून मंगळुरू विमानतळावर आला होता. यापूर्वी, 35 वर्षीय रुग्ण संयुक्त अरब अमिराती (UAE) मधून कोल्लमला पोहोचला होता. तपासणीनंतर त्याच्यामध्ये लक्षणेही आढळून आली. जॉर्ज म्हणाले की, दोन रुग्णांची नोंद झाल्यानंतर, राज्यातील पाच जिल्हे तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा, अलाप्पुझा आणि कोट्टायम या जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहेत. कारण रुग्णांचा या जिल्ह्यांशी संपर्क आला आहे. येथे दुबईहून परतलेल्या आणखी एका रुग्णाला उपचारासाठी परियाराम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही चौकशी करण्यात येत आहे.
मंकीपॉक्सचा झपाट्याने प्रसार होत असल्याचे पाहून केंद्र सरकारही सावध झाले आहे. पहिला रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांवर देखरेख आणि उपचार यांचा समावेश आहे.
प्रवासासाठी गाइडलाईन्स
परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांना आजारी लोकांच्या संपर्कात येणे टाळावे.
त्यांना जिवंत किंवा मृत वन्य प्राणी आणि उंदीर, खार, माकडे यांच्या संपर्कात येणे टाळावे.
प्रवाशांना वन्य प्राण्यांचे मांस न खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आफ्रिकेतील प्राण्यांपासून बनविलेले क्रीम, लोशन आणि पावडर वापरू नका.
आजारी लोक किंवा संक्रमित प्राण्यांच्या संपर्कातील कपड्यांपासून दूर रहा.
जे लोक गेल्या 21 दिवसांत मंकीपॉक्सने बाधित देशांमध्ये प्रवास करून परतले आहेत आणि त्यांना या आजाराची लक्षणे आहेत त्यांना संशयित रुग्णांच्या यादीत समाविष्ट केले जाईल. शरीरावर पुरळ आलं असेल, खूप ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, अशक्तपणा आणि लिम्फ नोड्स सुजणे ही लक्षणे आहेत. संशयित रुग्ण कोणत्याही वयाचा किंवा लिंगाचा असू शकतो.
Monkeypoxmeter.com च्या डेटानुसार, आतापर्यंत 76 देशांमध्ये 12,701 रुग्णांची पुष्टी झाली आहे. यापैकी 9,708 लोकांना मंकीपॉक्सचा सर्वाधिक फटका युरोपमध्ये बसला आहे. त्याच वेळी, या रोगाने प्रभावित शीर्ष 10 देशांमध्ये ब्रिटन, स्पेन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा, नेदरलँड्स, इटली आणि बेल्जियम यांचा समावेश आहे. मंकीपॉक्सने यावर्षी तीन जणांचा बळी घेतला आहे.